माझ्यातल्या मला
आणि तुझ्यातल्या तुला
कधी कळलंच नाही
कि, तुझ्यातला मी..
माझ्यातली तू..
केव्हाचेच
समरस झालेत एकमेकात..
भकास आणि उदास दिसणाऱ्या वाटेवर
बेशरमाचं झाड बघून मनाला प्रसन्न करणारा मी..
मोहवून टाकणाऱ्या गुलाबाच्या बगिच्यात
फुललेल्या गुलाबांना न्याहाळत,
मनाला सावरत बसलेली तू
गोंजारत आहोत एकमेकांच्या
तुच्छ भावनांना..
तुला माझ्या वाटेवर दिसत असतील
तुझ्या बगिच्यातली गुलाबाची फुलं..
आणि मला तुझ्या बगिच्यात दिसतय
माझं बेशरमाचं झाड..
पण स्वप्नवत वाटावं
इतकं भयाण आहे वास्तव..
माझ्या वाटेवर कधी शोभणारच नाही गुलाबाचं अस्तित्व..
आणि तुझ्या बगिच्यातही अमान्य होईल माझं बेशरमाचं झाड..
म्हणून शेवटी,
तुझा बगीचा तुलाच सुपूर्द
आणि माझी वाट मला..
माझ्यातल्या मला
आणि तुझ्यातल्या तुला
जाणून बाहेर काढावं लागेल
तुझ्यातला मी..
माझ्यातली तू..
नेहमीसाठी..
No comments:
Post a Comment