Saturday, July 8, 2017

समीक्षा

हो, हे स्वप्नच आहे

तू आणि मी
एकत्र बसलोय...
खूप दूर एकांतात
कुना एका झाडाखाली..

झुळझुळ वारा वाहतोय
मी वाचतोय
तुझ्यावर केलेली
माझी कविता
आणि
तू ऐकतेय डोळे मिटून..
सोबतच ऐकू येतेय पानांची फडफड..

तुला स्वप्न दाखवतोय
कवितेतून साकारतोय
तुझं-माझं सोबतचं आयुष्य..
तू अलगदच पकडलाय माझा हात..
आणि मी तुझ्या बोटांना..

"ना कशाची चिंता
ना कुणाची पर्वा..
खरं-खोटं, चूक-अचूक
जिथे कसलीच भीती नाही
अश्या कुना एका टेकडीवर
आपलं घर..
भिंतीवर प्रेमाचा ओल असलेलं"

तु पण डोळे मिटून
घेतेय त्या कवितेचा आस्वाद
कदाचित समीक्षाच करत असते मनात

कविता संपते..
स्वप्न भंगते..

समीक्षा मात्र सुटत नाही..
खऱ्या-खोट्याची, चूक-अचुकची
माझ्या प्रेमाची,
आपल्या आयुष्याची..

ना तिथे तू असते..
ना तिथे झाड असतं..
स्वप्नातल्या टेकडीचा पत्ता लागत नाही..
घराच्या भिंतिंचा ओलही दिसत नाही..

तिथे फक्त असतो मी..
डायरीचा कागद फडफड करत असतो
माझी कविता माझ्याशीच बोलत असते..
ती शोधत असते तिची समीक्षा..
माझ्या आयुष्याची समीक्षा..

नेहमीसाठी..

माझ्यातल्या मला
आणि तुझ्यातल्या तुला
कधी कळलंच नाही
कि, तुझ्यातला मी..
माझ्यातली तू..
केव्हाचेच
समरस झालेत एकमेकात..

भकास आणि उदास दिसणाऱ्या वाटेवर
बेशरमाचं झाड बघून मनाला प्रसन्न करणारा मी..

मोहवून टाकणाऱ्या गुलाबाच्या बगिच्यात 
फुललेल्या गुलाबांना न्याहाळत,
मनाला सावरत बसलेली तू

गोंजारत आहोत एकमेकांच्या
तुच्छ भावनांना..

तुला माझ्या वाटेवर दिसत असतील
तुझ्या बगिच्यातली गुलाबाची फुलं..
आणि मला तुझ्या बगिच्यात दिसतय
माझं बेशरमाचं झाड..

पण स्वप्नवत वाटावं
इतकं भयाण आहे वास्तव..

माझ्या वाटेवर कधी शोभणारच नाही गुलाबाचं अस्तित्व..
आणि तुझ्या बगिच्यातही अमान्य होईल माझं बेशरमाचं झाड..

म्हणून शेवटी,
तुझा बगीचा तुलाच सुपूर्द
आणि माझी वाट मला..

माझ्यातल्या मला
आणि तुझ्यातल्या तुला
जाणून बाहेर काढावं लागेल
तुझ्यातला मी..
माझ्यातली तू..
नेहमीसाठी..