Thursday, January 5, 2012

मी.. आणि कुर्वेज न्यू मॉडेल..

अकरावी व बारावीच्या दोनवर्षात मी खूप काही शिकलो असे म्हणायला हरकत नाही..या वर्षांनी मला खूप काही दिलं, कॉलेज ला दांडी मारायची कधी इच्छाच झाली नाही.. अकरावीत अनेक मित्रं आणि त्यात रमणारा मी.. कॉलेज च्या Gathering मध्ये शिवाजी महाराजांचं पात्र मिळालं आणि मी सूर्यावर स्वार झाल्याचं मला आताही आठवतं. माझा मित्र कुणाल आणि अविनाश नेहमी माझ्या सोबत असायचे.. ते माझ्यासाठी जीव की प्राण होते. कधी कोणत्या शिक्षकांनी रागावलं नसेन असा विद्यार्थी मी कधी नव्हतोच. प्रत्येक शिक्षकाकडून टोमणे, किवा त्यांचा राग मी सहन केलाय. परंतु माहितेय का.. हे वय असं असतं की या वेळी तुम्ही कुणाचं ऐकून घेणे बिलकुल खपवून घेत नसता. मी हे सगळा खपून यासाठी घेतलाय की माझी सहनशक्ती बाकीच्यांपेक्षा थोडी जास्तच होती. म्हणजे आताही आहे.. पण एकदा मीही कुलकर्णी बाईंच्या वर्गातून न विचारता तडक बाहेर निघालोय. कुलकर्णी बाई म्हणजे आमच्या वर्गशिक्षिका. अतिशय कडक. लई भारी.. (वजनाने नाही ह..) गणित शिकवायच्या.. ते काय आहे ना..आपलं आधीपासूनच गणिताशी वैर.. आणि सोबतच गणित शिकवणाऱ्याशी सुद्धा.. काय म्हणून हे देवच जाणे.!!

केतकी आणि मी..शिवाजी

कॉलेज च्या प्रत्येक कार्यक्रमात मी भाग घेतलाय.. घेतलाय म्हणजे जबरदस्तीने दिलाय असे म्हणायला हरकत नाही. जिथे कुणी मुले भाग घेण्यास तयार नसत तिथे माझे नाव आवर्जून टाकले जायचे. त्यामुळेच की काय माझ्यात जिथे तिथे तोंड मारायची सवय जडली.. म्हणजेच कोणत्याही कार्यक्रमात कोणतीही तयारी न करता मी अर्धा तास तरी भाषण देवू शकतो. दोन-तीनदा तर मी प्रेक्षकात बसलेला आणि सूत्रसंचालक माझं नाव घेऊन मोकळा झालेला. अश्यावेळी मला आजू बाजूचे मित्रं भानावर आणत. कधी मला डुलकी आलेली तर कधी माझं लक्ष नसायचं. कारण आता माझी पाळी आहे, किवा या कार्यक्रमात मी भाग घेतलाय हेच मला माहिती नसायचं.. या सगळ्या मागे फक्त एक नाव होत.. संजय तिजारे सर.!! तिजारे सरांमुळे मी सगळ्यांच्या परिचयाचा झालो होतो. माझं नाव घेताच सभागृहात विद्यार्थी टाळ्यांचा कडकडाट करीत. कारण मी एकदा बोलायला गेलो तर मग कुणाचच ऐकायचो नाही.

माझ्या भाषणामुळे किंवा एकूणच माझ्या कॉलेज मधल्या वागणुकीमुळे मला मित्रं मिळाले.. मैत्रिणी मिळाल्या.. ते आजही माझ्या सोबत आहेत. खुशबू, केतकी, अंकिता अश्या अनेक जवळच्या मैत्रिणी मिळाल्या.. कुणाल आणि अविनाश आधी पासूनच होते..आणि कॉलेज मध्ये कुणाशीच वैर नसल्यामुळे अनेक मित्र मी जमविले आहे.. सगळ्यांबद्दल सांगणे तर जमणार नाही परंतु त्यातील काहींशी परिचय पुढल्या वेळी करून देईल.!!